संताजी महाराजांचा जीवनपट श्री संत जगनाडे महाराज यांचा संक्षिप्त परिचय

    महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे. येथे संतांची मोठी श्रृंखला आहे. संतांनी सर्व जातीत जन्म घेऊन भगवद् भक्तिच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे जीवापाड प्रयत्न केले. शैव, वैष्णव, सगुण, निर्गुण अशा सर्व सामंजस्य प्रकारच्या संत परंपरा विकसित केल्या. केंद्र बिंदु पंढरपूर असून विठ्ठलाच्या नामस्मरणात भजन, किर्तन करीत लाखोंच्या संख्येने पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या पाच संतांना महाराष्ट्राचे पंचरत्न (पंचायतन) म्हटले जाते. अशा संत परंपरेच्या मालिकेत संताजी जगनाडे महाराज यांचे महत्त्व विशेष आहे.

sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat

    मानव धर्माचे रक्षण असाच संतांचा बाणा होता. संतांच्या ठायी 'भेदभाव, अमंगळ, कोणाच्याही जीवाचा न घडो मत्सर', हीच दृष्टी होती. संत जगनाडे महाराजांचा साडे तीनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजेच शिवशाहीचा तो काळ होता. मराठ्यांचा उदयाचा तो काळ होता. भागवत सांप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सामान्य माणसाला आपला धर्म सापडला. शिवरायाच्या काळात सामान्य माणसाला आपल्या पराक्रमाची जाणीव झाली. तसेच संत तुकारामांच्या काळात माणूस म्हणून कसं जगावं हा महामंत्र संत संताजी जगनाडे लिखीत (तुकारामाची गाथा) च्या रुपाने उदयास आला. टाळ, मृदंग, वीणा, चिपळ्या, तबला, डफली ही संताची साधने होती. अभंग, किर्तन, भजन, प्रवचन, नामस्मरण ही संतांची माध्यमे होती. तर देव प्राप्त व्हावा हे त्यांचे साध्य होते.

    संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म जगनाडे कुटूंबात विठोबापंत आणि मथाबाई या दाम्पत्याचे पोटी खेड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र चाकण येथे झाला. घरचे वातावरण आध्यात्मिक व धार्मिक होते. वडीलांनी देवघरात बसून केलेली पूजा, वाचलेली पोथी, पांडूरंगाचे नामस्मरण, आईने देवापुढे घातलेली रांगोळी, केलेले नामस्मरण, रोजची सांजवात, देवापुढे बसून केलेली उपासना, प्रार्थना, आरती या वातावरणामुळे आई-वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा प्रभाव संताजींच्या बाल मनावर होऊ लागला. संताजींचे शिक्षण व्यवहारातले ज्ञान व हिशेब येण्यापुरते जेमतेम झाले होते. इ. स. १६२८ ते १६३१ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या भयावह दुष्काळाचे वेळी संताजी पाच वर्षांचे होते. दुष्काळाची बिकट परिस्थिती पाहन मानवी जीवनाच्या नश्वरतेचे बीज त्यांच्या अंतरतळात रोवले गेले. सर्वत्र हाहाकार माजला होता. असंख्य गुरेढोरे, पशुपक्षी व लोक अनान्न करीत मृत्युमुखी पडत होते. संपूर्ण मानव जीवन खिळखिळे झाले होते. वैदीक तत्वज्ञानाला व ईश्वर निष्ठेला तडे जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे सामान्य जनता अधिक दैववादी व आध्यात्मिक वृत्तीची होऊन आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाऊन काहीतरी नविन करण्याच्या विचारांनी प्रेरीत होत होते व समाजाला हिम्मत देत होते. संताजींच्या संस्कारक्षम मनावर या परिस्थितीचा बराच परिणाम झाला.

    श्री संत जगनाडे महाराजांच्या वडीलांचा व्यवसाय तेलघाण्याचा होता. घाण्यावर तेल काढणे व ते बाजारात विकून प्रपंच चालविणे असा होता. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुध्दा रोज सव्वा मण तेलाची चंदी असल्यामुळे त्यांचा राजदरबाराशी जवळचा संबंध होता. चाकण क्षेत्रात (गावात) जगनाडे घराण्याचा वाडा होता. या वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी असायची. वाडा माणसांनी माणूसकीने नेहमी भरलेला असायचा. संताजी महाराजांनी सुध्दा वडीलांच्या व्यवसायात हातभार लावणे सुरु केले. फावल्या वेळात संताजी जवळच असलेल्या जंगल व डोंगरावर घरच्या गाई (गोधन) चारावयास नेत असत. इ.स. १६३६ मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी संताजींचा विवाह खेड तालुक्यातील कहाणे कुटूंबातील यमुनाबाईशी झाला. संताजींना बाळोजी व भागुबाई अशी दोन अपत्य झालीत. पण त्यांचा पिंड संसारी नव्हता. भक्तिमार्गातच आपल्या जीवनाचे सार्थक असल्याचे संताजींनी ओळखले. कालांतराने हळूहळू संसारी जीवनाचा त्याग करीत संताजी नामस्मरणाकडे वळले. याची जाणीव महाराजांना आली होती.

     श्री क्षेत्र चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात संताजी नेहमी किर्तन, भजन, कथा, प्रवचन यात विशेष रुची घेत असत. दिनक्रमात सोळा वर्षे निघून गेलीत तोच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग येऊन उभा राहिला.जानेवारी महिन्यातील थंडीचा तो दिवस होता. चक्रेश्वरच्या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे किर्तन होते. आजूबाजूच्या गावातील अठरा पकड जातींचे लोक या किर्तनाला गोळा झाले होते. संताजी सुध्दा श्रोते म्हणून या किर्तनाला आले होते. टाळ, विणा चिपळ्यांच्या आवाजात मंदिरात गजर सुरु झाला.संत तुकाराम महाराजांचे किर्तन सुरु झाले. भावपूर्ण रसाळ अभंगवाणी संताजींच्या कानावर पडली. संताजी भारावून गेलेत.त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसन येत होती. परस्पर नेत्रांनी एकमेकास ओळखले गुरुशिष्याची भेट झाली. अनंत काळाचे वाटसरू इहलोकीच्या मार्गावर परस्परांना भेटले. चक्रेश्वराच्या साक्षीने संताजींनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानले व येथूनच संत तुकाराम महाराजांचा अनुयायी परिवार सुरु झाला. हीच संताजी महाराज व संत तुकाराम महाराजांची प्रथम भेट जानेवारी इ. स. १६४० साली झाली.संताजी या नंतर त्यांचे सोबत सावली प्रमाणे. राहू लागले. त्यांच्या मुखकमलातुन निघणारे अभंग (अमृतवाणी) आपल्या लेखणीने टिपू लागले. संत तुकाराम महाराजांच्या संगतीत राहून संताजींना संतत्व व कवित्व वृत्ती निर्माण झाली.

    संत संताजी जगनाडे महाराज इ. स. १६४२ साली श्री क्षेत्र सदुंबरे (मामाचे गावी, चाकण पासून १९ कि. मी. अंतरावर) येथे राहू लागले. संत तुकाराम महाराज रोज भंडारा डोंगरावर जाऊन पांडूरंगाचे नामस्मरण करीत असत. याच डोंगरावर संत संताजी सुध्दा फावल्या वेळात गोधन चरावयास नेत असत. संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्याची, अभंगाची जुळवाजुळव व ती लिहून काढण्याची गोडी संताजी महाराजांना प्रबळ करु लागली. संताजींचे अक्षर सुवाच्य, टपोरे, वळणदार व स्पष्ट वाचता येईल असे होते. इ. स. १६५१ साली संताजी महाराज पुन्हा चाकणला परत आले. श्री क्षेत्र संबरे व श्री क्षेत्र चाकण हे त्यांचे घर आंगण झाले होते. संताजींना संत तुकाराम 'संतु' या लघु पण प्रिय नावाने संबोधित असत. गाथा लिहिणे, तीन मुठी माती, पांडुरंग चालवी घाणा, निवदर्शन यासारखे अनेक आध्यात्मिक चमत्कारांचे अनभव संताजींनी आपल्या जीवनात अनुभवले. दरदष्टी, दृढनिर्धार आणि जिवापाड श्रध्देपोटी ह्या सर्व घटना घडल्यात, याला अंधश्रध्देचे वलय लागू नये संताजींनी मानव कल्याणासाठी अंधश्रध्दा आणि भोंदगिरीला कुठेही वाव दिलेला नाही. संताजींना लोक आता संत संताजी जगनाडे महाराज म्हणून ओळखू लागले होते.

     संत संताजी जगनाडे महाराज देहप्रकृतीने सात्विक, शांत व प्रेमळ होते. संत तुकाराम महाराजांच्या संगतीत त्यांनी अनेक अभंगांची रचना करुन स्वयंस्फूर्त काव्य संग्रहाची गाथा (वह्या) तयार केली. या गाथेची सर्वत्र किर्ती होत होती. बहजन समाजाची श्रध्दा व भक्तिने ही गाथा ओतप्रोत होत होती. संत तुकाराम महाराजांना या गाथेमुळे प्राप्त झालेली लोकप्रियता पाहून समाजातील काही समाज कंटकांनी आपल्या सहकाऱ्यां सोबत अभंगाची गाथा (वह्या) इर्षेपोटी इंद्रायणी नदीत फेकून दिल्यात. तुकाराम महाराजांना मरणप्राय दुख झाले. अन्न, पाणी वर्ण्य केले. गुरुंची दयनीय अवस्था पाहून त्यांचे प्राण वाचावे ह्याच शुध्द उद्देशाने संत संताजी महाराजांनी स्वत:ला मुखादेगत (पाठ) असलेले अभंग, गावोगावी फिरुन गावकऱ्यांकडून गोळा केलेले अभंग(अभंग सचेत होऊन अनेकांच्या मुखी संचार करीत होत)असे सर्व अभंग गोळा केले, यांची जुळवाजुळव केली. अहोरात्र प्रयत्न करुन लिखाण केले व तेरा दिवसात अभंगाची गाथा (वह्या) जशीच्या तशीच तयार करुन संत तुकाराम महाराजांच्या स्वाधीन केली व त्यांचे प्राण वाचविले. तुकारामाची गाथा यातील एक एक शब्द, वाक्य, रचना, अभंग हे संत संताजीच्या लेखनी रुपी मुखातुन प्रकट झाले आहे. जसे चार वेद, सहाशास्त्र, अठरापुराणे प्रसिध्द आहेत. तसेच ही गाथा म्हणजे पाचवा वेद आहे असे म्हणतात. इ.स. १६४५ -४६ साली अशात-हेने तुकारामाची गाथा या ग्रंथाचा पुनर्जन्म झाला.

     संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर संत संताजी महाराजांना जग उदास वाटू लागले. संत तुकोबारायाच्या सानिध्यात त्यांची मानसिक व शारीरिक तयारी पूर्ण झाली होती. सृष्टीतील विश्वव्यापक श्री हरीची ओळख संत संताजी महाराजांना झाली होती. जनसामान्यांचे कल्याण हेच यापुढील उद्दीष्ट्य असे संत संताजींच्या डोळ्यापुढे होते. महाराजांजवळ अभंगरुपी मौल्यवान ठेवा होता. अभंगाचे गाठोडे हेच संत संताजी महाराजांचे खरेखुरे धन होते. इ. स. १६७० साली मोगल सैन्यांने चाकणवर हल्ला चढविला तेव्हा संत संताजी जीव धोक्यात घालून संकटावर मात करीत त्यांच्या तावडीतून सोडवून हे गाठोडे श्री क्षेत्र सदुंबरे येथे लपून छपून आणून सुरक्षित ठेवले. माणसाला माणूसकीची देण देणारा संत संताजी जगनाडे महाराजांनी इ. स. १६९९ साली मार्गशीर्ष वय त्रयोदशीच्या दिवशी (वय ७५ वर्षे) श्री क्षेत्र सदुंबरे येथे देह ठेवला. विठ्ठल नामाच्या गजरात अत्यंयात्रा काढण्यात आली. समाधीस्थळी सर्व गावकरी पोहोचल्यावर महाराजांना समाधी देण्यात येत असतांना संपूर्ण शरीर मातीत झाकले गेले परंतु मुख कमल मात्र झाकले जात नव्हते. सर्व प्रयत्न असफल झाले. गावकरी चिंताग्रस्त होऊन बसले असता अचानक तुकाराम महाराज समाधी स्थळी प्रकट झाले. त्यांनी तीन मुठी माती संताजींच्या डोक्यावर ठेवली. मुखकमल झाकले गेले. संताजी महाराज समाधीस्थ झाले असे म्हणतात की संतू-तुका जाडामध्ये दोघेही जीवंत असतांना विचारांची देवाणघेवाण (आणाभाका) झाली होती. ती अशीका आपल्यापैकी जो अगाेदर वैकुंंठाला जाईल त्याने दुसऱ्यास मूठमाती देण्यासाठी खाली मृत्यु लोकात यावे. दोघेही संत एकमेकांच्या वचनात गुंतले होते. खालील अभंगावरुन आपल्या लक्षात येईल.

चरिता गोधन माझे गुंतले वचन !

आम्हा येणे झाले एका तेलीया कारणे !!

तीन मुठी मृत्तीका देख, तेव्हा लोपविले मुख!

आलो म्हणे तुका, संतु न्यावया विष्णु लोका!!

संंपूर्ण आयुष्यात अंतरीची तळमळ ह्याच पवित्र भावनेतून संत संताजी जगनाडे महाराजांनी समाज सेवचे कठीण कार्य केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली यात शंकरदिपीका, प्रकाशदिप, घाण्याचे अभग, योगाची वाट, निगुणाच्या लावण्या, तैलसिंधु हे प्रसिध्द आहेत. संत संताजी जगनाडे महाराजांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वदय त्रयोदशीला येत असते. श्री क्षेत्र सुदुंबरे (कर्मभमी) येथे समाधी स्थळी मोठी यात्रा भरते.

संकलक - श्री. शैलेंद्र डिचोलकर, कणकवली

दिनांक 02-05-2020 00:00:00
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे
या साईटवरील सर्व साहित्‍य हे तेली गल्‍ली मासिकात 40 वर्षेत प्रसिद्ध झाले आसुन. सदरसाहित्‍य कोठेही प्रकाशित वा मुद्रीत करण्‍़यास मनाई आहे. सर्व हक्‍क तेली गल्‍ली मासिकाचे आहेत
copy right © 2020 www.Teliindia.com व तेली गल्‍ली
About TeliIndia TeliIndia.com हि साईट तेली गल्‍ली मासिकाची आहे. आपण वधु-वराचे नाव कोणत्‍या ही फी शिवाय नोंदवु शकता. तेली समाज वधु - वर विश्‍वाच्‍या सेवेची 40 वर्षींची परंपरा.
Contact us मदती साठी संपर्क करू शकता
अभिजित देशमाने, +91 9011376209,
मोहन देशमाने, संपादक तेली गल्‍ली मासिक +91 9371838180
Teli India, Pune Nagre Road, Pune, Maharashtra Mobile No +91 9011376209, +91 9011376209 Email :- Teliindia1@gmail.com
Develop & design by Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209, 9371838180, Copyright ©